पुणे : बहुजननामा – पुणे जिल्यातील राजगुरूनगरच्या थिगळे कुटुंबीयांच्या घरात तब्बल ५५ वर्षानंतर मुलगी जन्माला आली. इतक्या वर्षानंतर कुटुंबात मुलीचा जन्म झाल्याने राजगुरूनगरमधील रहिवासी असलेल्या समीर आणि नीलिमा थिगळे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ५५ वर्षांनी घरात मुलीचा जन्म झाल्याने त्या चिमुकलीचं आणि तिच्या आईचे घरातील सर्व सदस्यांनी जल्लोषात स्वागत केले. या दोन्ही मायलेकींनी रविवारी ८ सप्टेंबर रोजी वाजतगाजत घरी आणत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
गेले अनेक वर्ष थिगळे कुटुंबीय मुलीच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे तब्बल ५५ वर्षानंतर थिगळे कुटुंबियांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने, घरात प्रवेश करताच आई आणि लेकीचं फुलांच्या पायघड्यांनी-रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आलं. थिगळे कुटुंबीयांनी गावकरी, पाहुणे आणि उपस्थितांना पेढे, साखरेचं वाटप करत हा आनंदोत्सव साजरा केला. तसेच आई आणि बाळाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली गेली. कुटुंबातील महिलांनी फुगडी खेळत स्वागत केलं. या चिमुकलीचं शांभवी असे नाव ठेवण्यात आलं आहे.
आजकाल मुलींच्या संख्येत घट होत आहे. एकीकडे खेड तालुक्यात नुकत्याच जन्मलेल्या मुली नकोशा झाल्यानं बेवारस अवस्थेत सोडल्याच्या घटना ताज्या असताना याच खेडमध्ये राहणाऱ्या थिगळे कुटुंबीयांनी घरात मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं थाटामाटात स्वागत केले गेले. त्यांच्या या मुलगी जन्माच्या अनोख्या स्वागतामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.