बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानने प्रतिबंधात्मक तुरुंगातून जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजहर मसूद याची सुटका केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. अजहर मसूद याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने १ मे २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. यानंतर पाकिस्तानने त्याच्यावर कारवाई करीत त्याला प्रतिबंधात्मक तुरुंगात ठेवले होते.
१९९४ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असताना अजहर मसूद याला पकडण्यात आले होते. दहशतवाद्यांनी त्याच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले. इंडियन एअरलाईन्स विमानाचे १९९९ मध्ये अपहरण करून कंदाहारला नेण्यात आले होते. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात अजहर मसुदसह अन्य ५ दहशतवाद्यांना सोडण्यात आले होते. यानंतर अजहर मसुदने पाकिस्तानात जाऊन तेथून भारताविरुद्धच्या कारवाया सुरु ठेवल्या होत्या.
भारताने काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यापासून पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. यामुळे पाकिस्तान काहीना काही कुरापती करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अजहर मसूद याची तुरुंगातून सुटका केल्याचे सांगितले जात आहे.