पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनामुळे वर्षभरापासून सर्व शाळा बंद आहेत. आगामी वर्षातही सुरू होतील की ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागेल, याची शाश्वती नाही. अशाही परिस्थितीमध्ये स्थायी समितीमध्ये भाजप सदस्यांनी महापालिकेच्या शाळांत आठवी व नववी इयत्तेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आणि जपानी भाषा शिकविण्यासाठी चंग बांधला आहे. विशेष असे की महिन्याभरापुर्वीच याच स्थायी समितीने २०२१-२२ या वर्षीचे अंदाजपत्रक तयार केले असून त्यामध्ये यासाठी कुठलिही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे २० लाख रुपये खर्चाचा आणि ऐनवेळी आणला गेलेला हा प्रस्ताव कोणाच्या ‘मनी’ आला? यावरून चर्चा सुरू आहे.
‘ग्लोबल पुणेकर’ या उपक्रमाअंतर्गत पुणे महानगरपालिका व विद्याभारती इन्स्टिट्यूट फॉर फॉरेन लँग्वेजेस या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या आठवी आणि नववीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणार्या विशेषत: विद्यानिकेत शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आणि जपानी भाषा शिकविण्यात येणार आहे. वेगाने बदलणार्या जगामध्ये परकिय भाषेचे ज्ञान आवश्यक झाले आहे. जागतिक बदलामध्ये आपला सहभाग असावा असे वाटत असेल तर आपला देश सोडून उर्वरीत जगातील रितीरिवाज, संस्कृती यांची माहिती असणेही गरजेचे आहे. यासोबतच करियरच्या योग्य निविडीसाठीही जागतिक भाषांचा उपयोग होतो. पुणे शहरात परकिय भाषा शिकविणार्या संस्था कार्यरत असून त्यांचे अभ्यासक्रम शुल्क अधिक असल्याने निम्न मध्यम व निम्न वर्गातील विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम परवडत नाहीत, त्यामुळेच विद्याभारती इन्स्टिट्यूट फॉर फॉरेन लँग्वेजेस या संस्थेच्या माध्यमातून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात वरिल चार भाषांचे बेसिक व्याकरण, दैनंदीन जीवनात उपयोगी पडणारे संभाषण, सोपी वाक्यरचना ऑडीओ, व्हिडीओ आणि चित्रांच्या माध्यमातूून शिकविली जाणार आहे.
यासाठी ८ शिक्षकांना १२ लाख रुपये पगार, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ३ लाख रुपये, पुस्तके १ लाख ६० हजार रुपये, इंटर्नल परिक्षा घेणे १ लाख रुपये, ऍन्युअल जर्मन डे साजरा करणे २ लाख रुपये व इतर खर्चासाठी १ लाख रुपये असा २० लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर शाळा बंद आहेत, दहावीच्या परिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, आगामी शैक्षणिक वर्षात शाळा कधी सुरू होणार हे अद्याप निश्चित नाही. महिन्याभरापुर्वी चालू वर्षीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सुमारे साडेआठ हजार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकामध्ये शिक्षणासाठी सुमारे ४५० कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. परंतू यामध्ये परकीय भाषा शिकविण्यासाठी तरतूद तर सोडाच परंतू साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. असे असताना स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपच्या सदस्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव ऐनवेळी मांडला आणि बहुमताच्या जोरावर मंजुरही करण्यात आला आहे.
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की महापालिकेच्या विद्या निकेतन शाळांतील दहावीचा रिझल्ट वाखाणण्यासारखा असतो. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणामध्ये मोठी मजल मारली आहे. हे विद्यार्थी जागतिक स्पर्धेत यावेत, यासाठी परकीय भाषांचे ज्ञान देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. कोरोनानंतर ज्यावेळी शाळा सुरू होतील, तेंव्हा हा उपक्रम सुरू होईल. या प्रस्तावाला प्रशासकिय मान्यता व अन्य मान्यता घेण्यात येतील.