पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृतांची संख्या अधिक असल्याने चिंता कायम आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात 1985 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2376 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 1985 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 03 हजार 945 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2376 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 1 लाख 77 हजार 524 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 23 हजार 645 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 91 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 53 रुग्ण शहरातील आहेत. तर 38 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4070 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2776 तर हद्दीबाहेरील 1294 रुग्णांचा समावेश आहे. शहरामध्ये हद्दीबाहेरील 2165 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील 248 रुग्णांवर पुण्यात उपचार सुरु आहेत.
आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपळे गुरव, थेरगाव, भोसरी, निगडी, चिखली, पिंपरी, सांगवी, चिंचवड, संत तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, दिघी, किवळे, काळेवाडी, फुगेवाडी, चऱ्होली, पुनावळे, आकुर्डी, मोशी, काळेवाडी, रहाटणी, बोपखेल, मुळशी, वडगाव, कोंढवा, जुन्नर, मावळ, पुणे, नारायणगाव, खडकी, बोपोडी, लोहगाव, फुरसुंगी, कासारसाई, वाघोली, कोथरुड, वाजेवाडी, वारजे, हाडपसर, आळंदी, खेड चाकण येथील रहिवाशी आहेत.