घुसमट झाल्यामुळेच ‘वंचित’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

July 5, 2019

पुणे बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीमध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरु असून पक्षाच्या संस्थापक सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे.तसेच पक्षात आरएसएसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामाकाजात हाेत असल्याने त्याचा फायदा भाजपलाच होत असून पक्षात घुसमट हाेत असल्याने मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील माने यांनी पुण्यात माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, संघात वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेचे तिकीट दिले जाते तसेच पक्षाचे महासचिव पद व पक्ष प्रवक्ते पद दिले जाते. जे पडळकर संभाजी भिडे यांचे समर्थक आहेत. अशा लोकांना पद दिल्यामूळे नाराज असल्याचेही ते बोलले. यावरुन आर.एस.एसचा पक्षात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप वाढला असून त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माने यांनी केली. तसेच आपण पक्षाच्या सदसत्वाचा आणि पार्लमेंट्री बाेर्डाच्या सदसत्वाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

माझी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यशैलीबाबत मतभेद आहेत. माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वाईट बाेलणार नाही. परंतु आम्ही एकत्र काम करणं शक्य नाही. यंदाच्या लोकसभेत आमचे काही निर्णय चुकले ,काॅंग्रेससाेबत आघाडी केली असती तर आमच्या तीन ते चार जागा आल्या असत्या. लाेकसभेचे सर्व उमेदवार आंबेडकरांनी स्वतःच निवडले होते परंतु लाेकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी आंबेडकरांवर टाकत नाही. ती आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यावेळी मला काही बाेलता आले नाही कारण मी पक्षाच्या चाैकटीत हाेताे. आता मी हे सांगताेय कारण मी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

आपण पक्षातून बाहेर पडल्यामुळे स्वतंत्र वाट निवडणार पण भाजप शिवसेनेला मदत हाेईल असे काम करणार नाही. आम्हा वंचितांना सत्तेत जायचे आहे. आंबेडकरांकडे जाऊन देखील सत्तेत जाणार नसू तर आम्ही आमची स्वतंत्र वाट निवडू. यासाठी आगामी विधानसभेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करु तसेच आरपीआयच्या विविध गटांशी देखील चर्चा करु. प्रकाश आंबेडकर यांनी काॅंग्रेसला ४४ जागांची ऑफर देणं हे काॅंग्रेसचा अपमान करणारं आहे. काॅंग्रेसशी मैत्री करायची असेल तर अशी भाषा याेग्य नाही. त्यामुळे आंबेडकरांनी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्या साेबत राहीन असे माने यांनी सांगितले.

एमआयएमचा उपयाेग झालाच नाही ?

यंदाच्या लाेकसभेत एमआयएम ने मदत केली असती तर प्रकाश आंबेडकर हे साेलापूरातून निवडूण आले असते पण तसे झाले नाही त्यामुळे एमआयएमचा वंचितला उपयाेग झालाच नाही असे माने यांनी म्हंटले आहे.