पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सोशल मीडियावर डॉक्टर महिलेचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ४० हजार रुपयांच्या खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणी म्हणून त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख निर्माण केली होती.
याप्रकरणी कर्वेनगर परिसरातील २७ वर्षीय डॉक्टर महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर असून, त्यांची फेसबुकद्वारे आरोपीशी ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी हा त्यांना कोमल नावाने बोलत होता. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे संपर्कात आले. काही दिवसांनी तरुणीच्या मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्याने अनावधानाने तिच्याकडून वैयक्तिक व्हिडीओ व फोटो आरोपीच्या मोबाईलवर पाठविण्यात आले. त्यानंतर आरोपीने संधीचा फायदा घेत महिला डॉक्टरला फोन करुन व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ४० हजाराच्या खंडणीची मागणी केली. त्यावेळी व्हॉट्सअॅपवर बोलत असलेली कोमल नसून अज्ञात तरुण असल्याची महिला डॉक्टरला जाणवले. त्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक शिवनंदा जाधव हे करीत आहेत.