पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात काल जम्बो कोव्हिड सेंटरच उदघाटन करण्यात आलं. कोविड सेंटरच्या उदघाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याआधी त्यांनी खिशातली सॅनिटायझरची बाटली काढली आणि मीडियाच्या बुमवर सॅनिटायझर फवारले. मगच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या या कृतीतून त्यांनी जणू कोरोना संसर्गापासून सावध राहण्याचा संदेश सर्वांना दिला आहे.
राज्यात कोरोना प्रसार होऊ नये म्हणून राजकारणी मंडळी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन सातत्याने करत असतानाच त्यांनी स्वतःचीही काळजी घेण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तर स्वतःची सर्वाधिक काळजी घेताना दिसत आहेत. तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्हज घालूनच ते घराबाहेर पडतात दिसतात. काल तर त्यांनी पत्रकारांना बाईट देताना चक्क मीडियाचा बुमच सॅनिटायज केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून अजित पवारांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्हज घालतानाच त्यांनी लोकांशी हस्तांदोलन करणेही बंद केलं आहे. तसेच कार्यकर्त्यांनी कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ते ज्या कार्यक्रमास जातात तिथे मोजकीच उपस्थिती असते. शिवाय ते ठिकाणही सॅनिटायज केलं जातं. स्टेजवरील खुर्च्यांमध्ये अंतर ठेवलेले असते. आता तर त्यांनी चक्क सॅनिटायझरची बॉटलच सोबत ठेवली असून पत्रकारांशी बोलतानाही चक्क त्यांचे बुम सॅनिटायज करुनच संवाद साधला आहे.
दरम्यान, शहर व ग्रामीण भागातील रुग्ण शहरात उपचाकरता येत आहेत. म्हणून निश्चित येथील कोव्हिड सेंटरचा वापर रुग्णांना होणार आहे. कोव्हिड सेंटर उभारणीस थोडा उशीर झाला असला तरी चांगल्या प्रकारे काम झालं आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं. पुणेकरांची रोगप्रतिकार शक्ती वाढली असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी नमूद केलं.