पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरात रविवारी (दि.7) 196 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 219 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 906 स्वॅब तपासणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 110 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 775 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 383 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 93 हजार 178 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 87 हजार 020 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, पुणेकरांसाठी मागील अकरा महिन्यापासून कोरोनाच्या बाबतीत शनिवारी दिलासादायक घटना घडली. मागील अकरा महिन्यानंतर शनिवारी दिवसभरात पहिल्यांदाच कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. पुणे शहरात कोरोनाचा पहिला बळी 30 मार्च 2020 रोजी झाला होता.मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे.