पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या दोन आठवडयाच्या समोर आलेल्या आकडेवारीवरून पुण्यात कोरोनाचा धोका कायम असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 1 हजार 633 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील तब्बल 12 जणांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील एकाचा कोरोनामुळं पुण्यात मृत्यू झाला आहे.
सध्या पुणे शहरात कोरोनाचे 10 हजार 723 सक्रिय रूग्ण आहेत. त्यापैकी 351 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 16 हजार 463 वर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 2 लाख 803 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं तब्बल 4 हजार 937 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 9 हजार 762 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 1 हजार 633 जणांचे कोरोनाचे अहवाल हे सकारात्मक आले आहेत.