बहुजननामा ऑनलाइन टीम – औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांची पुण्यातील सदाशिव पेठ येथील जागेचे बनावट कागदपत्रे तयारकरून फसवणूक करण्यात आली आहे. काल हा प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली असून, एकाचा शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी शशी शंकर पोडवाल (वय ५१, रा. आळंदी रोड येरवडा), आसिफ जलिल खान (वय ६१, रा. मार्केटयाड), अन्वर युनूस खान पठाण (वय ५४, रा. गोखलेनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत गायत्रीदेवीचे स्वीयसहायक बलराज अरुण वाडेकर (वय ३७, रा. गुरुवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वकीलासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यवसायिक आहेत. ते श्रीमती गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांचे पीएही आहेत. दरम्यान श्रीमती गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांच्या मालकीची सदाशिव पेठेत टिळक रस्त्यावर जागा आहे. यादरम्यान आरोपींनी संगनमत केले आणि शशी पोडवाल यांनी असिफ व अन्वर यांच्याशी मिळवून या जागेचे प्रॉपर्टी बनावट नोटराईज समझोता करारनामा केला. तसेच श्रीमती गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी व त्यांच्या मुली चारुशीला राजे पंत प्रतिनिधी व हर्षिता पंत प्रतिनिधी यांचे फोटो लावून खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. पंत प्रतिनिधी यांचे वकील अॅड पिसाळ यांनी हे माहीत असताना देखील बनावट दस्त ऐवज तयार करून तो खोटा आहे हे माहीत असताना देखील पंत प्रतिनिधी यांची फसवणूक केली आहे.