शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील करंदी फाटा ते तळेगाव ढमढेरे या नऊ किलोमीटरच्या रस्त्याची एक वर्षापुर्वी अंदाजे १३ कोटी रुपये खर्च करुन पीएमआरडीएच्या माध्यमातून काम करण्यात आले होते माञ एका वर्षात या रस्ताची चाळण झाली आहे. या रस्त्याने प्रवास करणे देखील मुश्किल झाले आहे. नागरिकांकडून देखील अधिकाऱ्यांकडे वारवांर रस्ता दुरुस्ती बाबत मागाणी केली जाते माञ रस्ताकाही दुरुस्त होण्याचे नाव घेइना. येत्या दोन दिवसांत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पीएमआरडीए आणि संबधित कंत्राटदाराने सुरू करावे, अन्यथा या रस्त्यावर उतरुण आंदोलन करण्याचा इशारा भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी दिला आहे.
निवडणूकीच्या आधिच करंदी फाटा ते तळेगाव ढमढेरे हा नऊ किलोमीटरचा रस्ता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या माध्यमातून 13 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच हा रस्ता खचला होता. अनेक खड्डे देखील पडले होते. त्यानंतर त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, मात्र एक वर्षानंतर पुन्हा या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रारी माहीती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे,लक्ष्मणदादा गव्हाणे,सागर दरेकर यांनी अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या.
या भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक असल्याने रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तर नगर रोडवरुन चाकण रोडला जाण्यासाठी काही दिवसांपूर्वी सुखकर वाटणारा रस्ता आता धोकादायक ठरू लागला आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून आणि घाई घाईत या रस्त्याचे काम पूर्ण केल्याने या रस्त्याची अशी दुरवस्था झाली असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.