हिंगोली : बहुजननामा ऑनलाईन – कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्याने चक्क एका गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी खाटेवर उचलून नेऊन रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार एका महिलेसोबत घडल्यानंतर उच्च न्यायालयाने येथे तात्काळ रस्ता तयार करण्याचे आदेश दिले होते. रस्ता मंजूर झाल्या नंतरही रस्ता काही झाला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे पुन्हा एकदा गावातील एका महिलेस प्रसूतीसाठी खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
कळमनुरी तालुक्यातील कारवाडी गावातील सुवर्णा ढाकरे यांना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रसूतीवेदना सुरू झाल्या. गावात दवाखाना नसल्याने त्यांना हिंगोली जिल्हा रुग्णालयापर्यंत न्यायचे होते. गावातून जाण्यासाठी पक्क रस्ता नाही. त्यामुळे वाहन नाही. तर नुकत्याच झालेल्या पावसामुळे करवाडी ते नांदापूर रस्ता चिखलात रुतला आहे. सहा किलोमीटरचे अंतर असल्याने एकदा गावकऱ्यांनी वेदनेने असह्य झालेल्या सुवर्णा ढाकरे यांना खाटेवर टाकले. आणि रिमझिम पाऊस पडत असताना अनेकांनी छत्र्या हातात घेऊन गर्भवती महिलेला सांभाळत चिखलातून कसरत करून अंतर गाठले.
नांदापूर येथे शासकीय रुग्णवाहिका आली होती. तेथून सुवर्णा ढाकरे यांना हिंगोली जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे प्रसूतीच्या महिलेला असंख्य वेदना सहन कराव्या लागल्या. तर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गावकर्यांना कसरत करावी लागली. किमान याची तरी दखल घेऊन या भागातील रस्ता तातडीने तयार करण्यात यावा.
एकीकडे नितीन गडकरी यांनी मोठमोठी हवे रस्ते बनून दळणवळण साठी सोईस्कर केले आहे पण महाराष्ट्रामध्ये अनेक खेड्या पाड्यात गावातील मुख्य रस्त्याच्या अवस्था दयनीय आहेत. तर कुठे रस्तेच नाहीत. त्यामुळे स्थानिक रस्त्याकडे भाजप सरकार अजूनही लक्ष देत नाही.अशी चर्चा नागरिकांतून सुरू आहे.