सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – येत्या ३० डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. प्रणिती या सध्या सोलापुरात असून त्यांना मुंबईमधून बोलावणे आले आहे.
काँग्रेसच्या स्थापनदिनाच्या कार्यक्रमाबाबत प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये नगरसेवक चेतन गरोटे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती दिली. तसेच कार्यकर्त्यांना मुंबईला जाण्याची तयारी करण्याची सूचना दिली आहे.
प्रकाश वाले यांनी प्रणिती यांना संपर्क करून आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळणार आहे काय? असे विचारले असता प्रणिती यांनी सध्या तरी मुंबईला बोलावले आहे. काही कळेपर्यंत वाट पाहावी लागेल, असे सांगितले. तसेच शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका फिरदौस पटेल, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, अरुण शर्मा यांनी प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी केली आहे.
Visit : bahujannama.com