जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव हिने केलेल्या आत्महत्याप्रकरणी सीआयडी चौकशी व्हावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर निषेध मुकमोर्चा काढण्यात आला. शहरातील सिग्नल पॉईंटपासून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी महिलांनी निषेधाचे बॅनर घेतलेले होते. सिग्नल पाईंटपासून स्टेशन रोडने तहसील कार्यालयावर मुक मोर्चा आला असता, नायब तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलिस उप निरीक्षक श्री. पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा, की उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील शिंपी समाजाच्या अल्पवयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव या बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे तिने आत्महत्या करून स्वत:ची जीवन यात्रा संपवली. संजय घुमरे या नराधमाने अजाण प्रणालीवर अमानवी अत्याचार केला व तिला पुन्हा जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकाराला घाबरून तिने आत्महत्या केली. या घटनेतील संबंधित नराधमाला अटक झाली असली तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी व पिडीत प्रणालीच्या हवालदिल झालेल्या कुटुंबीयांना न्याय व धीर द्यावा. या अमानवी घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत असे निवेदनात म्हटले आहे. मोर्चात शहरासह तालुक्यातील शिंपी समाजाचे स्री, पुरुष, युवक, युवती मोठया संख्येने सहभागी झाले होते..
पाचोऱ्यात मूक मोर्चा
या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून पाचोरा येथील क्षेत्रीय अहिर शिंपी समाजातर्फे तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येवून निवेदन सादर करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उंडणगाव, ता. सिल्लोड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली शिंपी समाजाची अल्पवयीन विद्यार्थिनी प्रणाली कृष्णा जाधव या मुलीसोबत महाविद्यलयातील नराधम लिपिक संजय घुगरे रा. घतांबी, ता. सिल्लोड याने सैतानी कृत्य करून मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले. यामुळे पीडित मुलीला जीव गमवावा लागला. या घटनेतील आरोपीस अजिंठा पोलीस ठाण्यात अटक करून गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा शहर तालुका क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे युवकयुवती महिला समाज बांधवांनी आज एकत्र येऊन येथील हुतात्मा स्मारकात शोक सभा घेऊन घटनेचा निषेध केला. यातील नराधामस कठोर शिक्षा व्हावी, घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करून ॲड.उज्ज्वल निकम यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करावी, पीडित कन्येच्या कुटुंबाला समाजाचा पूर्ण पाठिंबा देण्यात येऊन प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवावे, अशा आशयाचे मागण्यांचे निवेदन देण्यासाठी हुतात्मा स्मारक येथून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार यांच्यावतीने अव्वल कारकून व्ही.बी.कुमावत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अहिर शिंपी समाज महिला मंडळ, युवा मंडळ, तालुका शिंपी समाज कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.