पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर आता पूजा ज्या खोलीत राहत होती तेथून बऱ्याच वस्तू समोर आल्या आहेत. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी पूजा चव्हाण हिच्या राहत्या घरातून चार मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. यातील दोन बाटल्या भरलेल्या तर दोन बाटल्या रिकाम्या होत्या, अशी माहिती लगड यांनी दिली.
या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने अधिक बोलता येणार नसल्याचे पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी एका वेबसाईटसोबत बोलताना सांगितले. पूजा चव्हाण हिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाली याचा उल्लेख आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारीच म्हणजे पुणे पोलीस आयुक्त योग्य वेळी बोलतील असे संकेत कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली,असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे. याबाबत पूजाचे मित्र असलेल्या दोन तरुणांनी पोलिस जबाबात माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही जबाब नोंदवले आहेत. तसेच पूजाच्या आई-वडिलांचे देखील जबाब नोंदवले असून यामधून पोलिसांच्या हाती नवनवी माहिती येत आहे.
पूजाच्या बहिणीचा खुलासा
पूजा चव्हाण हिची छोटी बहिण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात तिने म्हटले आहे की, माझी बहिण वाघिण होती, ती असं करु शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल. दोन दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता. फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहिण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलं माहित आहे, असे दिया चव्हाण हिने म्हटले आहे.