मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – एकीकडे न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी होणार असून या प्रकरणाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
या पोलीस अधिकाऱ्याचे नाव रवींद्र थोरात असून १३ जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती मिळत आहे. ते लाचलुचपत शाखेत उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान उस्मानाबाद येथे कार्यलयात काम करतेवेळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तिथल्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना सोलापूर रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा मृत्यू झाला.
रवींद्र थोरात हे बर्वे यांच्या पथकातील सदस्य म्हणून काम करत असून सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या वेळी थोरात यांच्याकडे न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणासोबत संबंधित महत्वाच्या कागदपत्रांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनुसार मिळत आहे.
थोरात हे न्या. लोया यांच्या मृत्यू संबंधित प्रकरणात दोनही वेळेस सहभागी होते. लोया यांचा मृत्यू झाल्यानतंर त्यांच्या कुटुंबाला संपर्क करण्याची जबाबदारी थोरात यांच्याकडे होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले असताना त्या चौकशी पथकात थोरात यांचाही सहभाग होता.