पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2152 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 1815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरापालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2152 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 53 हजार 080 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1815 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 28 हजार 450 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 3804 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 14 रुग्ण शहरातील आहेत. तर 2 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2927 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2079 तर हद्दीबाहेरील 848 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण चिंचवड, चिखली, आकुर्डी, काळेवाडी, भोसरी, पिंपळे गुरव, बिजलीनगर, पिंपरी, खेड, येरवडा येथील रहिवाशी आहेत.