पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे शहराला लागून असलेल्या औद्योगिक नगरीमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 900 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच दरम्यान 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महानगर पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 900 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 हजार 517 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेल्या 900 रुग्णांपैकी 869 रुग्ण शहरातील असून 31 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहराबाहेरील 632 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 26 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 960 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 794 तर शहराबाहेरील 166 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या 26 रुग्णांपैकी 17 रुग्ण शहरातील आणि 9 रुग्ण शहराबाहेरील आहेत.
शहरामध्ये सध्या 6 हजार 723 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 133 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात गेल्या 24 तासामध्ये 618 रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 28 हजार 575 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात गेल्या 24 तासात चिखली, दापोडी, पिंपरी, चिंचवडगांव, भोसरी रावेत, वाकड, नेहरुनगर, बिजलीनगर, खराळवाडी, अजमेरा, शाहूनगर, निगडी, चऱ्होली, देहुरोड, जुन्नर, दौंड, लोणावळा, कर्वेनगर, तळेगाव, देहुगांव येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.