नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना फरारी घोषित केले असून सरकारने शरीफ यांच्यावर आपल्या मेडिकल रिपोर्ट न पाठवल्यामुळे आणि जामीन तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. यासोबतच त्यांचा जामीनही रद्द केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सात वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगत असून मागच्या वर्षीच्या २९ ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने आरोग्य कारणांमुळे त्यांना आठ दिवसांचा जामीन दिला होता. ते १९ नोव्हेंबरला उपचारासाठी लंडनला गेले असताना तेथून अजून परत आलेले नाही.
पंतप्रधान इम्रान खान यांचे सल्लागार डॉ. फिरदौस अधिक अवान यांनी बुधवारी कॅबिनेट बैठकीत म्हटले की, शरीफ आपल्या मेडिकल रिपोर्ट पाठवायला अपयशी ठरले आहेत. त्यांनी आपले मेडिकल सर्टिफिकेट पाठवले होते, जे वैद्यकीय मंडळाने स्वीकारले नाही. याच आधारावर त्यांना फरारी घोषित केले आहे. ते लंडनवरून लवकर आले नाहीत तर त्यांना आरोपी घोषित केले जाईल.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले होते. शरीफ यांना अनेक वेळा पत्र लिहीत लंडनमधील कोणत्या तरी हॉस्पिटलची मेडिकल रिपोर्ट दाखल करायला सांगितले होते. पण त्यांनी रिपोर्ट पाठवला नाही, ज्याचा मेडिकल बोर्डाने स्वीकार केला आहे. जर आज नवाज हे खरच गंभीर स्वरूपात आजारी असतील, तर विस्तृत मेडिकल रिपोर्ट दाखल करायला काय हरकत आहे?
इम्रान यांच्या सल्लागाराने नवाज यांचा भाऊ आणि विरोधी पक्षनेते शाहबाज यांनाही घेरत शाहबाज अनके महिन्यांपासून विनाकारण लंडनमध्ये असल्याचे म्हटले आहे. ते आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत नसून इथे त्यांच्यासाठी आलिशान कार्यलयाची व्यवस्था आहे, ज्याच्यावर प्रत्येक महिन्याला खूप खर्च केला जातो. त्यांनी लगेच लंडनवरून परतले पाहिजे.