बहुजननामा ऑनलाईन टीम : मूळची पाकिस्तानी असलेली एक महिला इटा येथील जालिसार ब्लॉकमधील एका पंचायतीची हंगामी ग्रामप्रधान (सरपंच) म्हणून काम करत असल्याची उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. दरम्यान संबधित महिलेला ग्राम प्रधान पदावरुन हटवले असून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
बानो बेगम असे या हंगामी ग्रामप्रधान महिलेचे नाव असून त्या मूळच्या कराचीच्या आहेत. बानो या मागील 40 वर्षांपासून भारतात राहत आहेत. बानो यांचा विवाह येथील उत्तर प्रदेशातील गौडो गावातील एका स्थानिक व्यक्तीशी झाला असला आहे. बानो यांच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे. गावातीलच एका व्यक्तीने या महिलेविरोधात तक्रार दाखल करत त्या पाकिस्तानी असल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. तपासामध्ये हा दावा खरा असल्याची माहिती समोर आल्याने हे घडलं कसं हे शोधून काढण्यासाठी आता प्रशासनाची एकच धावपळ सुरु झाली आहे.
याबाबत इटाचे जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांनी बानो यांना आधारकार्ड आणि इतर सरकारी कागदपत्र कशी काय मिळाली यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेशही दिलेत. याच कागदपत्रांच्या आधारे बानो यांना ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडण्यात आले आणि त्यांनातर त्या गावातील पंचायतीच्या प्रमुख झाल्या आहेत.
बानो बेगम या 65 वर्षांच्या असून त्या 35 ते 40 वर्षांपूर्वी इटामधील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात आल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी येथील अख्तर अली या स्थानिकाशी लग्न केले आहे. त्यानंतर त्या इटामध्येच राहतात. त्यांच्याकडे व्हिजा असून त्यांनी अनेकदा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे.
2015 च्या पंचायत निवडणुकांमध्ये बानो यांची गौडौ गावातील पंचायत सदस्य म्हणून निवड झाली. ग्राम प्रधान असणाऱ्या सेहनात बेगम यांचा 9 जानेवारी 2020 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर गावतील नागरिकांच्या समितीने बानो बेगम यांच्याकडे हंगामी स्वरुपात ग्राम पंचायतीचे मुख्य पद दिले असल्याचे जिल्हा पंचायतराज अधिकारी अलोक प्रियदर्शनी यांनी सांगितल आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बानो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असे आदेशही दिल्याचेही प्रियदर्शनी यांनी दिल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.