पुणे बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशा प्रकारचे मेसेजही सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यात आता खुद्द छगन भुजबळ यांनी या वृत्ताचं खंडन करत मी शिवसेनेत जाणार असल्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे.
येवल्यात मांजरपाडा प्रकल्पाचं जलपुजन करण्यासाठी ते आले होते. तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्यापाठोपाठ छगन भुजबळदेखील शिवबंधनात अडकणार असल्याचे मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन अहिर यांच्यासंदर्भातील वृत्त मी टिव्हीवर ऐकलं आहे. सचिन आणि माझं काही बोलणं झालेलं नाही. गुजरातला जाणारं पाणी परत महाराष्ट्रात आणणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचं आज माझ्या हस्ते जलपूजन केलेलं आहे. त्यामुळे माझ्याबद्दल जे काही विचारत आहात. त्यात काही तथ्य नाही. असं ते म्हणाले. त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनही शिवसेना प्रवेशाचं वृत्त फेटाळून लावलं आहे. तर हे वृत्त म्हणजे तथ्यहीन आणि हास्यास्पद आहे. असं ते म्हणाले.