पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – आयपीएल च्या धर्तीवर मराठा क्रिकेट लीग ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचे आमिष दाखवून संचालकपदावर नियुक्ती केल्याचे बनावट पत्र देऊन तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी स्क्वेअरकटस स्पोर्टस प्रा़ लि़ कंपनीचे विन्सेंट जॉन, त्यांची पत्नी पूनम, साडू रवी पनवर, गणेश दिघे, नरेश लक्ष्मणराव पिल्ले, अभिजित रावकर व अलिश शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मॅकविन जेराम सलढाणा (वय ४६, रा. माहिम) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार स्क्वेअरकटस स्पोर्टस कंपनीच्या वाकड येथील कार्यालयात १ मार्च ते ६ मार्च २०२० दरम्यान घडला. स्क्वेअरकटस कंपनीतील लोकांनी संगनमत करुन आयपीएलच्या धर्तीवर मराठा क्रिकेट लीग ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सलढाणा यांना सांगितले.
जॉन यांनी सलढाणा यांना कंपनीचे संचालकपदावर घेतले असल्याचे सांगून बनावट पत्र दिले. क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी ६ महिन्यांच्या कालावधीसाठी २० टक्के दराने परताव्याचे आमिष दाखविले. ते स्वत:: व त्यांचे मित्र महेंद्र शहा, पल्लवी शहा व दिशा उमंग शहा यांच्याकडून एकूण १ कोटी ४८ हजार ३९ हजार रुपये घेतले. तसा त्यांच्याशी करार केला. परताव्यासाठीचे चेकही त्यांना दिले होते. प्रत्यक्षात मुदत संपल्यावर त्यांनी दिलेल्या चेकचे पेमेंट स्टॉप करुन त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केली.