बहुजननामा ऑनलाईन – नागपूर हायकोर्टाने अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावले आहे. नवनीत राणा यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली होती. हायकोर्टाने सुनावणी करताना त्यांना ही नोटीस पाठवली आहे.
आव्हान देताना या याचिकेत म्हटले आहे की, हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून नवनीत राणा या पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या आहेत. या कारणामुळे त्या आरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अपात्र होत्या. तरीही त्यांनी दिशाभूल करत निवडणूक लढविली असून, त्यांना अपात्र करण्यात यावे अशी विनंती याचिकेत केली आहे.
तसेच फेरनिवडणूक घेण्याची मागणी देखील याचिकेत करण्यात आली आहे. या दरम्यान न्यायालयाने सुनावणीनंतर राणा यांना नोटीस बजावली असून लवकरात लवकर उत्तर देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. यावेळी अॅड. संदीप चोपडे यांनी अंबडकर यांच्याकडून बाजू मांडली.