अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित नववे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन ९ व १० मार्च रोजी अमरावती येथील मातोश्री विमलाबाई सभागृह येथे पार पडणार आहे. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर राहणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आ. तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे राहणार आहे. यामध्ये तीन परिसंवाद, दोन विशेष व्याख्याने, शाहिरी जलसा आणि महाराष्ट्रातील निमंत्रित नामवंत कवींचे कविसंमेलन होणार आहे. या संमेलनात रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजक प्रा. प्रसेनजित तेलंग, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, दादासाहेब क्षीरसागर, बाबा भाकरे, सहसंयोजक डॉ. बी. टी. अंभोरे, क्रांती देशमुख, डॉ. प्रदीप दंदे, प्रा. विजय रोडगे व सागर दुर्योधन यांच्यासह संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.