नाशिकः बहुजननामा ऑनलाईन – नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत( Shiv sena leader sanjay raut) यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये देखील महाआघाडीचा प्रयोग होणार असून जिल्हाप्रमुखपदी कोणतेही लॉबिंग सुरु नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई आणि नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच असेल. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने रचना करावी लागतेय, बदल करावे लागणार आहेत. त्याची सुरुवात केली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढण्याचा फायदा झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील नेता युपीएचा अध्यक्ष झाला तर, आनंदच. शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती होती. त्यामुळे या ऩेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. शेतकरी आंदोलन कुणीही हायजॅक केले नाही, ते शेतक-यांचे आंदोलन आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर सरकारने एक पाऊल मागे घेतल्यास सरकाने शरणागती पत्करली असा होत नाही. तसेच इडी, सीबीआय यांनी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागू नये, असेही राऊत म्हणाले.