नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकत नसल्याचे कारण देणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
यापूर्वी ईडीने समन्स बजावले होते मात्र पटेल यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहता येत नसल्याचे कळवले होते; पण ईडीने आता दुसऱ्यांदा समन्स बजावून हजर राहण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे युपीए सरकारच्या कार्यकाळात कोट्यवधींच्या हवाई वाहतूक घोटाळा प्रकरण पटेल यांना भोवणार हे निश्चित झाले आहे.
एअर इंडियाशी संबंधित हे प्रकरण असून झालेल्या नुकसानीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी माजी नागरी विमान वाहतूक मंत्री या नात्याने ईडीने पटेल यांना चौकशीसाठी हजर राहंण्यासाठी हे समन्स दुसऱ्यांदा काढले असून येत्या १० किंवा ११ जूनला ईडीसमोर पटेल यांना हजर व्हावे लागणार आहे. याआधी ६ जूनची तारीख होती मात्र पटेल हजर न राहिल्याने हे समन्स दुसऱ्यांदा काढण्यात आले आहे.