परळी : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय वातावरण तापले आहे. त्यात राज्याचे लक्ष असलेल्या परळीमध्ये हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भाऊ बहिणीतील चुरस होणार आहे. मात्र या हाय व्होल्टेज लढतीत दोघांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच पराभव टाळण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून नवे डावपेच आखले आहेत.
लोकसभा निवडणूकीत बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि धनंजय मुंडे यांना पराभवाचा धक्का देत पंकजा मुंडेंनी आपली ताकत दाखवली होती. त्याची सल धनंजय मुंडे यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी नवीन अस्त्र परळी मतदारसंघात बाहेर काढले आहे. त्यांनी विधानसभेला काही महिने बाकी असताना प्रचाराची धुरा आता पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडे दिली असून त्या डोअर टु डोअर संवाद यात्रा त्यांनी काढली आहे. परळीत निवडणूकीआधीच राजकिय वातावरण ढवळून निघाले असून महिलांच्या प्रश्नासंदर्भात पत्नी राजश्री मुंडेंना धनंजय मुंडेंनी उतरवून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे भगिनींना टक्कर देण्याची तयारी केली आहे.
परळीत नेमकं कोण बाजी मारणार य़ाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ताई, भाऊ की आणखी कोणी? त्यात राजश्री मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून परळी शहरातील प्रभागनिहाय महिलांशी संवात साधत प्रभाग पिंजून काढले आहेत. महिलांना असलेल्या समस्यांवर यावेळी भर देण्यात आला आहे. त्या तात्काळ सोडविण्यासाठी राजश्री मुंडे प्रयत्न करणार आहेत. परंतु धनंजय मुंडेंच्या या खेळीमुळे पंकजा मुंडेंसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.