नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता ग्राहकांना अधिक अधिकार मिळणार आहेत. कोणतेही डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डची सेवा आता बँक ठरवू शकणार नाही. रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांना निर्देश दिलेत की, ग्राहकांना जास्त स्वातंत्र्य देण्यात यावे. तसेच बँकांना सांगितले आहे की, आता कोणतीही खरेदी किंवा सेवा सुरू अथवा बंद करण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना देण्यात यावे.
कोणत्या सेवा तुम्ही सुरू अथवा बंद करू शकता
सध्याच्या सेवांपैकी इन्टरनेट बँकिंग, एटीएमचा वापर, ऑनलाईन खरेदी आणि पॉईंट ऑफ सेलमध्ये कार्ड स्वाईप करणे याचा समावेश आहे. केंद्रीय बँकेच्यानुसार आता ग्राहक आपल्या डेबिट-क्रेडिट कार्ड्सचा वापर स्वत: ठरवतील. जर तुम्ही खरेदीसाठी ऑनलाइन शॉपिंग करत नसाल तर हे स्वत: बंद करू शकता. याशिवाय बहुतांश कार्ड हे अंतरराष्ट्रीय वापरासाठी परवानगी असलेले असतात. यामुळे कार्ड्सद्वारे पैशांची फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. आता तुम्ही आपल्या डेबिट-क्रेडिट कार्ड्समधून ही सुविधा बंद करू शकता.
कोणत्या सेवा बँकांना प्रत्येक वर्षी द्याव्याच लागतील
रिझर्व्ह बँकने सर्व सरकारी व खासगी बँकांना सांगितले आहे की, आपल्या सर्व ग्राहकांना ट्रांजेक्शन अलर्ट, वेळोवेळी माहिती आणि बॅलन्सचे स्टेट्स एसएमएस अथवा इमेलद्वारे द्यावे लागेल. या सेवांमध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत.
या सेवा करा ताबडतोब बंद
बँकेशी संबंधित एका अधिकार्याचे म्हणणे आहे की, सध्या जवळपास सर्व बँका ग्राहकांना इंटरनॅशनल कार्ड्स देतात. यात काही नुकसान नसले तरी सर्वात जास्त बँक फ्रॉड यामध्येच होत असतात. कारण या कार्ड्सचा वापर सर्व जगात होऊ शकतो. यामुळे अनेकदा आपली बँकिंगची माहिती कोणत्यातरी सोशल साईट अथवा थर्डपार्टी अॅपच्या माध्यमातून घेऊन सायबर गुन्हेगार याचा वापर अंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरून पैसे चोरण्यासाठी करतात. याशिवाय आजकाल बँक वाय-फाय लेस किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड्स सुद्धा देते. अशा कार्डवर 2 हजार रूपयांपर्यंत व्यवहार करता येतात. यासाठी पिनची गरज नसते. जर अतिशय गरज नसेल तर ही सेवा बंद करता येते.
Visit : bahujannama.com