बहुजननामा ऑनलाईन – आता ED ची चौकशी करणे म्हणजे जणू राजकीय दबाव तंत्र झाला आहे. या सरकारचा केवळ एकच काम आहे ते म्हणजे जो कोणी सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणे. असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकरे यांनी राज यांना दिलेल्या पाठिंब्यावरही भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले ‘बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार अजूनही जिवंत आहेत, यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली आहे.’ राज ठाकरे यांनी आज ईडीसमोर चौकशी होणार आहे. यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये म्हणून मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे. तर ,मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पूर्व तयारीच्या दृष्टीने या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानकात बसवून ठेवले आहे. यावर पोलिसांनी स्पष्टीकरण देत असे सांगितले आहे की, ही कोणतीही कारवाई नसून खबरदारी म्हणून उचललेले पाऊल आहे. यादरम्यान मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना कीर्ती कॉलेज परिसरात पोलिसांकडून नेण्यात आले आहे.