नाशिक बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आता राजकिय वातावरण तापू लागले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतील वाद पुन्हा पेटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या वक्तव्याचा निषेध करत नाशिकमध्ये अजित पवारांविरोधात बॅनरबाजी करून आपला राग व्यक्त केला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार ?
३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला होता. त्यावेळी त्यांच्यावर टीका करताना अजित पवार यांची जभी घसरली आणि महाजन यांच नाव न घेता त्यांना नाच्या असं त्यांना संबोधलं होतं.
भाजप कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. काल भाजपच्या नेत्यांनीही अजित पवार यांच हे वक्तव्य नैराश्यातून असल्याची टीका केली होती. त्यानंतर आता नाशिकमधील राष्ट्रवादी भवनाबाहेर भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी निषेधाचं पोस्टर लावलं आहे.
काय म्हटलं आहे पोस्टरवर ?
गिरीश महाजन यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या अजित पवारांचा जाहीर निषेध. असं या मुकेश शहाणे यांनी लावलेल्या पोस्टरवर म्हटले आहे. तसेच अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या आधीच्या एक वक्तव्यावरून टीका केली आहे. तर त्यांचा एकेरी उल्लेखासोबतच अजित पवार यांना देशद्रोहीदेखील म्हटले आहे.
या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्या गिरीश महाजनांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद चिघळण्याची शक्यता आहे. या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही मंगळवारी केले होते. त्यानंतर नाशिकमधील कार्यकर्त्यांनी आता ही पोस्टरबाजी केली आहे.