बीड बहुजननामा ऑनलाईन – बीडमध्ये लोकसभा निवडणूकीत प्रा. विष्णू जाधव यांनी चांगली मते मिळविल्याने जिल्ह्यात वंचितची चांगली हवा आहे. त्यामुळेच सोमवारी विधानसभेच्या इच्छुकांच्या मुलाखतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार आणि कॉंग्रेसच्या जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती असलेल्या नेत्यांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर आहेतच. परंतु यावरून वंचितची बीडमध्ये राजकीय वर्तूळात चर्चा सुरु असल्याचेही चित्र आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून विदर्भात इच्छुक उमेदवारांची चाचपणी झाल्यानंतर आता मराठवाड्यात ही चाचपणी सुरु केली आहे. वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या चार सदस्यीय समितीकडून मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. बीडमध्ये मुलाखती पार पडल्या. त्यावेळी बरीच गर्दी जमली होती. मात्र यात लक्ष वेधून घेतलं. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे व कॉंग्रेसचे जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी.
या दोघांच्या हजेरीमुळे राजकीय फडात वेगळीच चर्चा रंगली आहे. साठे यांनी केज येथून उमेदवारीसाठी तर राजेसाहेब देशमुख यांनी परळीतून निवडणूक लढविण्यासाठी मुलाखती दिल्या. त्यासोबतच माजलगावमधून गंगाभीषण थावरे, गेवराईतून विष्णू देवकाते, यांनीदेखील मुलाखती दिल्या.