अमरावती : पावसाळा सुरु होऊन एक महिना झाला तरी राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. राज्यात अजून सुद्धा दुष्काळाचे संकट आहे. राज्यातील दुष्काळाची भीषण दाहकता लक्षात घेऊन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांना खासदार म्हणून मिळालेलं पहिले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे.
नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि आमदार रवी राणा देखील उपस्थित होते. राज्य दुष्काळाच्या छायेत असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे खासदारकीचं पहिलं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचं नवनीत राणांनी सांगितलं.
अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा यांनी त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांच्यासह वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी राणा दाम्पत्यानं जिल्ह्यातील पीक परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आणि तातडीनं मदत करण्याची मागणी केली. कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळे त्वरित मदत करण्याची मागणी राणा यांनी केली. राणा यांनी संवेदनशीलता दाखवत एक चांगला पुढाकार घेतला आहे. खासदार नवनीत राणा यांनी घेतलेल्या या पुढाकाराने अजून किती प्रतिनिधी पुढाकार घेणार हा खरा प्रश्न आहे.