बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला पत्नी आलियाने घटस्फोटासाठी नोटीस पाठविली आहे. नवाजुद्दीनला इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे 7 मे रोजी नोटीस पाठवली असून त्याला त्याच्याकडून काहीच उत्तर आले नसल्याची माहिती आलियाच्या वकिलाने दिली आहे.
लॉकडाउनमुळे स्पीडपोस्टने नोटीस पाठवणे शक्य झाले नाही. त्यामुळे इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आलिया सिद्दिकी यांनीसुद्धा त्यांच्या व्हॉट्स अॅपद्वारे नोटीस पाठवली आहे. मात्र नवाजुद्दीन यांच्याकडून अजून काही उत्तर आलेलं नाही. नवाजुद्ीन फक्त या नोटीसबद्दल मौन बाळगून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्या नोटीशीत केलेले आरोप काय आहेत हे मी स्पष्ट सांगू शकत नाही. पण आलिया यांनी नवाजुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काही गंभीर आरोप केले आहेत, अशी माहिती आलिया यांच्या वकिलाने दिली.
नवाजुद्दीन आणि आलिया यांच्या लग्नाला 10 पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत त्यांना दोन मुले आहेत. 2017 मध्येही दोघांच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार आले. मात्र अनेकदा त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतले होते.
आलिया म्हणाल्या, नवाजशी घटस्फोट घेण्यामागे एक नाही तर अनेक कारणे आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर 2010 पासून नवाज आणि माझ्यात मतभेद सुरू आहेत. मी प्रत्येक गोष्ट सांभाळून घेत होती. मात्र आता माझ्याकडून सहन होणार नाही. लॉकडाउन संपल्यानंतर आम्ही कौटुंबिक न्यायालयात रितसर याचिका दाखल करु अशी माहिती आलियाचे वकील भविन सहाय यांनी दिली आहे.