बहुजननामा ऑनलाईन टीम – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लसीची अमेरिकेत मानवी चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील ही पहिली मानवी चाचणी आहे. या चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. ज्यांना ही लस टोचण्यात आली, त्यांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत.
कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी ही लस विकसित करणार्या मोडर्ना कंपनीने सोमवारी जाहीर केले आहे. पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मार्चपासून या चाचण्या सुरु झाल्या होत्या. कोरोनावर लस संशोधन करणार्या मोडर्ना थेराप्युटीक्सला अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनकडून जलदगतीने आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी सुद्धा लवकरच लसीच्या मानवी चाचण्या सुरु करणार आहे. सध्या कोवीड 19 ची लस सर्वांसाठीच महत्वाची आहे. जगात जवळपास 100 संशोधकांचे गट कोरोनाला रोखणारी लस शोधून काढण्यासाठी संशोधन करत आहेत. संशोधन ते क्लिनिकल चाचण्या अशा वेगवेगळया टप्प्यांवर हे लस प्रकल्प आहेत.