मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच आता बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नवाजुद्दीनला नेमके काय झाले असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर नवाजुद्दीन अलिकडेच त्याच्या गावी गेला आहे. त्यामुळे त्याला क्वारंटाइन करण्यात आले आहे. ईद साजरी करण्यासाठी नवाजुद्दीन त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबईहून मुजफ्फरनगर येथे गेला आहे. 11 मे रोजी नवाजुद्दीनत्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत मुजफ्फरनगर येथील बुधाना गावी पोहोचला आहे. गावी जाण्यासाठी त्याने महाराष्ट्र राज्य सरकारची तशी कायदेशीर परवानगीही मिळविली होती.
मात्र नवाज मुंबईतून प्रवास करुन आल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना 14 दिवसांसाठी घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे 25 मे पर्यंत नवाज कोणालाही भेटू शकणार नाही. नवाजुद्दीन गावी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची तपासणी केली असून सगळ्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.