नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगाला अहिंसा, शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी मारुन त्यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेची पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे. गांधीजींच्या ७१ पुण्यतिथीदिनी ३० जानेवारी २०१९ रोजी हा प्रकार घडला होता. याच दिवशी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती.
हा सगळा प्रकार इतका विकृतपणे करण्यात आला होता की, पूजा पांडेने गोळी मारताच गांधींच्या पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता.
अखिल भारत हिंदू महासभा नेहमीच गांधी पुण्यतिथी शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पण आतापर्यंत गांधीजींच्या पुतळयाला गोळी मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली नव्हती. मात्र, यंदा त्यांनी आपल्या विकृत वागण्याचा कळस केला.
हिंदू महासभेच्या या कृत्याचा देशात सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. तसेच पूजा पांडेवर कठोर करवाईची मागणी होत होती. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवालही अनेकांनी विचारला होता.