नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवेसी यांचा सोशल मीडियावर धीरज पवार या कार्यकर्त्याने त्यांचा निळ्या, हिरव्या रंगाच्या कचऱ्याचे डबे दाखवून कचरा, असे संबोधले. या टिप्पणीसंदर्भात तीव्र प्रतिक्रिया जिल्हाभरात उमटल्या. या विघातक प्रवृत्तीवर कारवाई करा, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी काटोल पोलिसांत तक्रार करून कारवाईची मागणी केली.
हे कृत्य करण्या मागे दोषींचा उद्देश समाजात तेढ निर्माण करण्याचा आहे. सद्य:स्थितीत बाळासाहेब आंबेडकर व ओवेसी यांना सर्वच स्तरातून भक्कम पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक सभेला त्यांच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत निघत आहेत. त्यामुळे विरोधकांची पाचावर धारण बसली. जातिवादी शक्ती अशा प्रकारचे कृत्य करून समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहे. धीरज पवार याने काटोल विधानसभा क्षेत्र या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा मॅसेज टाकल्याने चांगलीच खळबळ उडाली असून कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. नागपुरातील एका राष्ट्रीय पक्षाचा तो कार्यकर्ता असल्याची माहिती शिष्टमंडळाची आहे. त्यामुळे दोन्ही समाजांच्या भावना दुखाविल्या गेल्या आहेत. माथेफिरूला तत्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भारिपचे तालुकाध्यक्ष दिगांबर डोंगरे व शहराध्यक्ष सतीश तायडे यांनी दिला.
दरम्यान, ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांनी चोवीस तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी पंजाब रोहनकर, मनोहर गोलाईत व एमआयएमचे इबूभाई पठाण, मुश्ताक शहा, रवी पाटील, सतीश पाटील, दिनेश तायडे, पवन सोनवणे, कुशल गायकवाड, अंकित सरदार, अशोक बागडे, दिगांबर भगत, मनीष रामटेके, प्रा. पी. एस. मेश्राम, प्रा. अशोक झांबरे, हर्षदीप पाटील, कोमल पाटील, पांडुरंग दाभणे, गुलाब तागडे, तिलक हाटे, सौरभ देशभ्रतार, बळवंत नारनवरे, राहुल तायडे, विठ्ठल वानखेडे यांच्यासह भारिपच्या कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.