बरेली वृत्तसंस्था – दलित मुलाशी लग्न केल्याने आपल्या नवऱ्याच्या जीवाला धोका असल्याचा BJP आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुलीचे वडील बितरी चैनपुरी जिल्ह्यातील भाजप आमदार आहेत.राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल असे त्यांचे नाव आहे. मुलीने जातीबाहेर लग्न केल्यामुळे पप्पू भरतौल यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
साक्षीअसे मुलीचे नाव असून त्यामध्ये तिने नवऱ्याच्या जीवाला धोका असल्याचे म्हटलं आहे. बुधवारी संध्याकाळी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये साक्षीचा पती अजितेश कुमार देखील आहे. साक्षी आणि अजितेशने हिंदू रितीनं लग्न केलं. पण, लग्न करणं आता जीवावर बेतलं आहे. याबाबत तिनं हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्यामध्ये वडील पप्पू भरतौल, भाऊ विक्की भरतौल आणि भावाचा मित्र राजीव राणा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं साक्षीनं आता एसपी यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
काय म्हणाली व्हिडीओमध्ये ?
दलित मुलाशी लग्न केल्याने नवऱ्याच्या जीवाला धोका असल्याचं साक्षी या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. तिचा पती देखील या व्हिडीओमध्ये दिसत असून त्यानं देखील सुरक्षेची मागणी केली आहे. आमदाराचे लोक आमच्या मागावर असून आमदाराचे मित्र राजीव राणा आपल्या लोकांसोबत हॉटेलमध्ये दाखल झाले असा दावा देखील साक्षीनं केला आहे. दरम्यान, अजितेश कुमारशी लग्न करून आपण खुश आहोत असं देखील साक्षीनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसंच पती किंवा त्याच्या कुटुंबियांना काही झाल्यास मी सर्वांना गजाआड पाठवेन असा इशारा साक्षीनं आपल्या वडिलांना दिला आहे.