बहुजननामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लवकरच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या युतीच्या वाटेवर आघाडीचे जिल्ह्यातील विद्यमान तसेच माजी आमदारही युतीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरीच्या विद्यमान काँग्रेस आमदार निर्मला गावित या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. या काँग्रेसचे दिग्ग्ज नेते आणि माजी खासदार माणिकराव गावित यांची कन्या आहे. जर निर्मला यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.
तर दुसरीकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीआधीच नाशिकमध्ये आघाडीला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढवलेले धनराज यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर धनराज महाले यांनी हाती शिवबंधन बांधले.
तसे तर धनराज महाले हे मूळ शिवसेनेचेच नेते आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दिंडोरीतून राष्ट्रवादीने धनराज महाले यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत भारती पवार यांनी धनराज महालेंचा पराभव केला. तर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनराज महाले यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीला आता दुहेरी धक्का बसला आहे. कारण लोकसभेत महालेंना तिकीट दिल्याने भारती पवारांनी पक्ष सोडला. तर आता धनराज महालेही राष्ट्रवादीतून बाहेर पडत आहेत.