नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती व तंत्रज्ञान इमारतीमध्ये असलेल्या स्ट्राँगरुमवर सीआरपीएफ, एसआरपीएफ जवानांची करडी नजर राहणार आहे. त्याचवेळी या स्ट्राँगरुमच्या बाहेरील बाजूस पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. स्ट्रॉंगरूमसाठी वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर ८ तासांनी अधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंगरूम परिसराची तपासणी करण्यात येणार आहे.
निवडणूक मध्ये सहभागी असलेले १४ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्राँग रुम परिसरात पाहणीसाठी परवानगीने तंबू लावता येणार आहे.नांदेड लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघात ६५.१५ टक्के मतदान झाले. या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅट गुरुवारी पहाटेपर्यंत नांदेड मतदारसंघांतर्गत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये आणण्यात आल्या. स्ट्राँगरुममध्ये या मशीन विधानसभा मतदारसंघनिहाय ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पहिल्या दिवशीच स्ट्राँगरुमला भेट दिली.