औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. मंगळवार दि 23 जुलै रोजी काकासाहेब शिंदे यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत शहिद काकासाहेब शिंदे यांना 10 लाख रुपये आर्थिक साह्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु आजपर्यंत महापालिकेने शिंदे कुटुंबियांना एका रुपयाचीही मदत केली नसल्याची बाब समोर आली आहे.
मनपाची सर्वसाधारण सभा गुरूवार दि 15 जुलै रोजी पार पाडली. या सभेत शहिद काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत का देण्यात आली नाही असा प्रश्न संतप्त नगरसेवकांनी विचारला. यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत निधी वितरीत केला जाईल असे आश्वासनही दिले शिवाय या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. इतकेच नाही तर महापौर फंडातून हा निधी द्यावा असी सूचनाही महापौरांनी प्रशासनाला दिली.
काकासाहेब शिंदे यांच्या फाईलवर आयुक्तांनी सही केली नव्हती. आयुक्त यानंतर दिल्लीला गेले होते. आयुक्तांचे आगमन सोमवारी मनपात झाले. परंतु सोमवारी मनपात आल्यानंतरही आयुक्तांनी फाईलवर सही केली नाही. आणखी एक बाब अशी की, मनपा प्रशासनाने महापौर फंडच उभारलेला नाही. महापौर फंडासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान कोणताही फंड मनपाला उभारता येणार नाही. असे असल्याने आणखी दोन महिने तरी शिंदे कुटुंबियांना मनपाकडून मदत मिळण्याची शक्यता कमीच आहे.
‘दोन-तीन दिवसात हा विषय मार्गी लागेल’ : घोडेले
या प्रकरणी बोलताना घोडेले म्हणाले की, “महपौर निधी उभारण्यासाठी आम्ही शासनाकडून मंजुरी आणू, असा एक ठराव प्रशासनाला हवा आहे. दोन तीन दिवसांत हा विषय मार्गी लागणार आहे.”
आंदोलनाचा इशारा
शहिद काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत मिळणार होती. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तशी घोषणा केली होती. मात्र वर्ष होत आले तरी त्यांना जाहीर झालेली मदत मिळालेली नाही. त्यांना जाहीर झालेली मदत त्वरीत द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांनी दिला आहे.