कोलकत्ता : वृत्तसंस्था – विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आवाहन संपुष्टात आले आहे. न्युझीलंडने भारताचा पराभव करून अंतीम सामन्यात प्रवेश केला. भारताच्या पराभवामुळे फॅन्स नाराज झाले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात पहिली फळी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर जडेजा आणि धोनी यांनी भारताचा डाव सावरला. रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर धोनीवर धावा करण्याची जबाबदारी आली.
मात्र, धोनी दुसरी धाव घेण्याच्या नादात मार्टिन गप्टिलने फेकलेला चेंडू थेट स्टंपला लागला आणि धोनी रन आऊट झाला. धोनी रन आऊट होताच कोलकत्ता येथील एका फॅन्सला याचा धक्का सहन न झाल्याने त्याचा हार्ट अॅटकने मृत्यू झाला. श्रीकांत मैती असे मृत्यू झालेल्या फॅन्सचे नाव आहे. श्रीकांत यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. दुकानाती टीव्हीवर ते न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सेमीफायनलचा सामना बघत होते. यावेळी ४९ व्या ओव्हरमध्ये धोनी रन आऊट झाला. त्यामुळे त्यांना हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा दुकानातच हार्ट अॅटकने मृत्यू झाला.
श्रीकांत यांच्या दुकानाजवळ असलेल्या स्वीट मार्टचे मालक सचिन घोष यांनी सांगितले की, मोठा आवाज आल्याने मी श्रीकांत यांच्या दुकानाकडे धाव घेतली. दुकानात जाऊ पाहिले असता श्रीकांत फरशीवर बेशुद्ध पडलेले दिसले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.