नवीदिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशच्या बहराईच लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या खासदार असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी भाजपाला धक्कातंत्र देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी. महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सावित्रीबाईंचा काँग्रेस प्रवेश भाजपासाठी मोठा हादरा मानला जात आहे. कारण फुले यांच्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला दलित मतांचा मोठा आधार होता.
सावित्रीबाई फुले यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपला सोडचिठी दिली होती. पण आपण कोणत्या पक्षात जाणार हे जाहीर केले नव्हते. खासदार सावित्रबाई फुले यांनी भाजपा समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप केल्यानंतर एकाच खळबळ उडाली होती. त्यांनी राम मंदिर आणि दलितांवरील वाढणाऱ्या हल्ल्यांवरुन भाजपला लक्ष्य केले होते. यामुळे त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. आणि आयुष्यात कधीही भाजपासोबत जाणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. याशिवाय समाजवादी पार्टीचे माजी खासदार राकेश सचान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राकेश सचान समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते फतेहपूरचे माजी खासदार आहेत.