चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – समाजात असलेला संभ्रम बाजूला ठेऊन समाजाच्या उध्दारासाठी लढा देण्याची गरज असून कोणताही राजकिय पक्ष का असेना तेली समाजाकडे दुर्लक्ष करणार नाही, असे प्रतिनिधीत्व उभे करण्याकडे समाजाने एकसंघ व्हावे, असे आवाहन पोंभुर्णा येथे आयोजित तेली समाज एकता महासंमेलनात उपस्थित मान्यवरांनी केले.
विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर तथा पोंभूर्णा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन तेली समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चिंतनासाठी श्री. संत शिरोमनी जगनाडे महाराज पुण्यतिथी पर्व तेली समाज एकता महासंम्मेलन कार्यक्रम सोहळा पोंभूर्णा येथे आयोजित करण्यात आला. सर्व प्रथम पोंभूर्णा शहरातून संत जगनाडे महाराजांचा जयजयकार करीत लेझिम व ढोलताशांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक महासंमेलनास्थळी आल्यानंतर हजारो तेली समाज बांधवाच्या उपस्थितीने तेली समाज एकता स्पष्ट दिसत होती. संत जगनाडे महाराज व थोर शास्त्रज्ज्ञ डॉं. मेघनाथ शहा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संमेलनाला सदुंबरे येथील संत जगनाडे महाराज यांचे चौदावे वंशज आणि तेली समाजाचे संस्थाध्यक्ष जनार्धन गोपाळराव जगनाडे, तेली समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणलाल साहु, युवा राष्ट्रीय अध्यक्ष उमेश साहु, विदर्भ अध्यक्ष रघुनाथ शेंडे, माजी आमदार देवराव भांडेकर, स्वागताध्यक्ष सूर्यकांत खनके, निशा भूरे, संघटिका शुभांगी पडोळे, महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी गुजरकर, घनशाम येनुरकर, डॉं. विश्वास झाडे, सरपंच विलास मोगरकार, घनशाम मुंगले, डॉं. प्रभुदास चिलबुले, ईश्वर नैताम, मोहन चलाख, नीलकंठ नैताम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
समाजाच्या विकासाकरिता समाजाने एकत्रित येण्याचे आवाहन चरणलाल साहू यांनी केले. अन्य मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले .यावेळी समाजातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या मागणीसह क्रिमीलियरच्या कक्षा वाढविणे आणि ‘एससी, ‘एसटी’ कमिशनच्या धर्तीवर तेली समाजालाही संवैधानिक दर्जा देण्याच्या मागणीवर या संमेलनात जोर देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत खनके यांनी केले. संचालन गंगाधर कुनघाडकर यांनी केले तर विनोद बुटले यांनी उपस्थितांचे आभार मानले.