पनवेल : बहुजननामा ऑनलाइन – लग्नास नकार दिल्याच्या रागातून मुलीसह आईवर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तर या घटनेत मुलीचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुजाता सिद्धार्थ बळखंडे (वय-18) आणि सुरेखा सिद्धार्थ बळखंडे (वय-37) असे मृत्यू झालेल्या आई आणि मुलीचे नाव आहे. तर सिद्धार्थ बळखंडे (वय-41) असे जखमी झालेल्या वडीलांचे नाव आहे. त्यांच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील अरुण डाऊर यांच्या चाळीत बळखंडे कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्या घरा शेजारी आरोपी राहतो. तो याच भागात डंपर चालक म्हणून कामाला आहे. आरोपी आणि बळखंडे कुटुंबीय मराठवाडा येथील असल्याने ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीच्या पत्नीचे निधन झाले असून त्याला दुसरे लग्न करायचे असल्याने त्याने बळखंडे यांच्याकडे सुजाता सोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
मात्र, बळखंडे कुटुंबाने सुजाताचे लग्न लावून देण्यास नकार दिला. आज सकाळी आठच्या सुमारास आरोप बळखंडे यांच्या घरी आला. त्याने पुन्हा एकदा सुजाता सोबत लग्न करण्याचा विषय काढला. त्यावेळी बळखंडे यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने सुजाता आणि सुरेखा यांच्यावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघींचा मृत्यू झाला. तर आरोपीने वडील सिद्धार्थ यांच्यावर देखील वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांचे पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून आरोपीची माहिती घेऊन आरोपीचा शोध सुरु केला आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी डॉगस्कॉड, फिंगर प्रिंट्स आदींना पाचारण करण्यात आले. पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.