नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील बहुतेक देश कोरोना विषाणूशी लढत आहेत, पण दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. बोलिव्हिया पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, गेल्या 5 दिवसांत त्यांना देशातील मोठ्या शहरांच्या रस्त्यांवर व घरांमध्ये 400 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चाचणी आणि मृतदेहांची अवस्था पाहून असे दिसून येते की त्यापैकी 85% पेक्षा जास्त कोरोना संक्रमित आहेत, ज्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, बोलिव्हियाच्या कोचाबांबा शहरमध्येच सुमारे 191 मृतदेह सापडले आहेत. त्याशिवाय ला पाझ शहरातून 141 मृतदेह सापडले आहेत, जे घरात सडत होते आणि काही रस्त्यावर विखुरलेले होते. राष्ट्रीय पोलिस संचालक कर्नल इव्हान रोजास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यापूर्वी अशी भयंकर परिस्थिती त्यांनी कधी पाहिली नाही. देशातील सर्वात मोठे शहर सांताक्रूझच्या रस्त्यांवरही 68 मृतदेह सापडले आहेत. केवळ या शहरातच देशातील 50% कोरोना संसर्गाची प्रकरणे आहेत. आतापर्यंत या एका शहरातच 60 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.
85% आहेत कोरोना संक्रमित
रोजास यांनी सांगितले की, आढळलेल्या मृतदेहांमध्ये 85 टक्क्यांपेक्षा जास्त संक्रमित आहेत. काहींची चाचणी केली गेली आहे तर काहींची लक्षणे पाहून याचा अंदाज लावता येतो. यातील काही आजार, भूक आणि हिंसात्मक घटनेत मारले गेले आहेत. नॅशनल एपीडिमियोलॉजी ऑफीसच्या म्हणण्यानुसार, सांताक्रूझनंतर आता ला पाझमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे आणि येथे रोज हजारच्या वर प्रकरणे आढळत आहेत. डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन आंद्रेस फ्लोरेस यांनी सांगितले की, 1 एप्रिलपासून आतापर्यंत असे 3000 पेक्षा जास्त मृतदेह काढले आहेत, ज्यात जास्त करून संक्रमित प्रकरणे होती. बोलिव्हियामध्ये संसर्गाची 60 हजारपेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. तर अधिकृतपणे 2200 मृत्यू झाले आहेत.
राष्ट्रपती देखील संक्रमित
बोलिव्हियाच्या राष्ट्रपती जिनिन अंज या देखील कोरोना संक्रमित आढळल्या आहेत. संक्रमणाची पुष्टी करत त्यांनी म्हटले की, मी कोरोना चाचणी केली होती, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या असेही म्हणाल्या की, त्या आयसोलेशनमध्ये राहूनही आपले काम सुरू ठेवतील. जिनिन यांनी गुरुवारी एका ट्विटमध्ये म्हटले की, ‘नुकतीच मी कोरोनाची चाचणी केली होती, आता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.’ तसेच त्यांनी असेही सांगितले की त्या आयसोलेशनमध्ये जातील आणि तेथूनच आपले काम चालू ठेवतील. त्यांनी हे देखील लिहिले की माझी प्रकृती चांगली असून मला स्वस्थ आणि मजबूत वाटत आहे.