मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या मध्ये नांदगाव मतदारसंघाचे आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधात मागील आठवडय़ात राष्ट्रवादीतील एका गटाने बैठक घेऊन येत्या निवडणुकीत पंकज भुजबळांना उमेदवारी नकोच, अशी मागणी केल्यावर आता त्यांच्या समर्थनार्थही बैठक घेण्यात आली. नांदगाव मतदारसंघात राष्ट्रावादीचे दोन गट पडले आहेत. एका गटाने पंकज भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. तर एका गटाने त्यांना विरोध करत मागील आठवड्यात आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पंकज भुजबळांना उमेदवारी न देण्यावर चर्चा झाली, तसंच यावर अनेकांनी समर्थनही देण्यात आले.
तर भुजबळांमध्ये मतदारसंघाचा विकास करण्याची क्षमता असल्याने पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी भुजबळ समर्थकांच्या मेळाव्यात केले. विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात पाटील यांनी आमदार पंकज भुजबळ यांनी १० वर्षांत मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधण्याच्या दृष्टीने कामे केल्याचे त्यांनी सांगितले. तसंच छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने मांजरपाड्याचे पाणी येवल्यात आले आहे. तसंच या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून मांजरपाड्याचे पाणी नांदगावात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि हे काम भुजबळच करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे क्षणिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.