नवी दिल्ली : वृत्तसंस्था- नवी दिल्लीतून इंदोरला जात असलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिरला प्रवास करत होते. परंतु शेजारच्या कूपमध्ये सुरु असलेल्या दारु पार्टी आणि त्यानंतर होणारा गोंधळ थांबवण्यासाठी त्यांना पोलिसांना पाचरण करावे लागले. रविवारी लोकसभा अध्यक्ष रात्री एसी फर्स्ट चेअरकारमधून प्रवास करत होते. त्यांच्या पुढच्या कूपमध्ये काही तरुण प्रवास करत होते. ट्रेनचा प्रवास सुरु होताच त्यांनी मद्यपानास सुरुवात केली.
यानंतर त्यांचा गोंधळही सुरू झाला. ओम बिरला यांचे पीए राघवेंद्र त्यांना थांबवण्यासाठी गेले तर ते तरूण त्यांच्याशीही वाद घालत बसले. यानंतर ओम बिरला यांनी पोलिसांना पाचारण केले. रात्री उशीरा 1 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन जेव्हा मथुरा जंक्शन पोहोचली तेव्हा आरपीएफ आणि जीआरपीने युवकांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला इंटरसिटी एक्स्प्रेसच्या एसीच्या सी कूपमधून प्रवास करत होते. तर शेजारच्या डी कूपमधून दिल्ली आणि गुरुग्राम(गुडगाव)चे 5 युवक इंदोरला जात होते.
पाचही मद्यपान करणार्यांचे चलान
सदर तरुणांच्या गोंधळामुळे आणि पीएशी घातलेल्या वादामुळे वैतागलेल्या ओम बिरला यांनी पीएमार्फत रेल्वे कंट्रोल रूमला याबाबत सूचना दिली. यानंतर रात्री उशीरा 1 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन जेव्हा मथुरा जंक्शन पोहोचली तेव्हा आरपीएफ आणि जीआरपीने नशेत असलेल्या 5 युवकांना अटक केली. आरपीएफने कूपमधून दारूची बाटली, स्नॅक्स, ग्लास, कोल्ड्रिंक जप्त केली. या तरुणांना कोर्टात सादर करण्यात आले. आरपीएफ प्रभारी सीबी प्रसाद यांनी सांगितले की, पाचही युवकांना ट्रेनमध्ये दारु पिणे आणि गोंधळ घालण्याच्या कलमांखाली दंड केला गेला आहे.