पुणे : प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज 10 डिसेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी साडेनऊ वाजता डॉन स्टुडिओ येथे ठेवण्यात येणार आहे. तर 11 वाजता वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कितीतरी दिवसांनी आज, त्या पैलतिरावर मिळेल मजला, अवंतिका, ऊन पाऊस, नुपूर, श्रावणसरी ही त्यांची गाणी गाजली आहेत. तर चि सौ कां, अनुमती, देऊळबंद, पुष्पक विमान, पाऊलवाट आणि रानभूल या चित्रपत्रांना त्यांनी संगीतबद्ध केले होते. आषाढी वारीसाठी गायक महेश काळे, कवी-गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी ’विठ्ठला…’ हे गाणे विठ्ठल चरणी अर्पण केले होते. या गीताचे बोल उर्दू भाषेत आहेत.
शास्त्रीय व आधुनिक संगीतातील सुर गुंफणारे नरेंद्र भिडे आपल्या कर्त्वृत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले होते. नरेंद्र भिडे यांनी एखादे गाणे संगीतबद्ध करताना, चाल लावताना कधीही बाऊ केला नाही. ते नेहमीच आपला अनुभव पणाला लावून काम करत. ते म्हणत की, मनाप्रमाणे काम केले तर ते लोकांपर्यंत पोहोचते. शास्त्रीय संगीत शिकल्याने गाण्याचा प्रकार कोणताही असो, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी, विचार देखील शास्त्रीय असायला हवेत.
नरेंद्र भिडे यांनी अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतले होते. पण, त्यांच्या आजोळची कलाक्षेत्राची पार्श्वभूमी असल्यामुळे संगीतक्षेत्रात त्यांचा प्रवास सुरू झाला होता.