माळशिरस : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीतील माळशिरस मतदारसंघात भाजपचे राम विठठल सातपुते १ लाख ३ हजार ५०७ मते मिळून विजयी झाले आहेत. राम यांच्या विरोधातील उत्तमराव जानकर यांना १ लाख ९१७ मत मिळून देखील पराभव झाला आहे. आपल्या पहिल्याच निवडणुकीत भरघोस विजय मिळवत राम सातपुते यांनी बाज मारली आहे. एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान हॉटेल मध्ये काम करणाऱ्या मुलापासून ते विधानसभा आमदार पदापर्यंत बाजी मारणारे हनुमंत डोळस यांच्याच मतदार संघात पुन्हा एकदा सामान्य कुटुंबातील व्यक्तीचा विजय झाला आहे. विजयसिंग मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचे नाव उमेदवारी पदासाठी जाहीर केले होते. त्यावेळी राम सातपुते कोण ? हा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु भरघोस मतांनी राम यांनी विजय मिळविला आहे.
दरम्यान, राम यांचे वडील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोईठाण या गावात ऊसतोड कामगार आहेत. त्यांचे कुटुंब भांबुर्डी या गावातील रहिवाशी आहेत. आपल्या मुलावर ऊस तोडण्याची वेळ येऊ नये म्हणून राम यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. राम यांचे वडील आजही गावी चपला शिवण्याचे दुकान चालवतात. राम यांच्या आई-वडिलांना अजूनही कल्पना नाही कि त्यांचा मुलगा आमदार होत आहे. परंतु आपल्या मुलाचे सगळीकडून कौतुक होत आहे. एवढेच त्यांना माहित आहे. राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांसमोर भाजपने तरुण चेहऱ्याला संधी दिल्याने माळशिरस येथे चुरशीची लढत होती. मात्र ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाल्याने सगळीकडे कौतूक केले जात आहे.
Visit : bahujannama.com